
गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात अचानक रक्तस्राव झालेल्या शहापूर तालुक्यातील वासिंद येथील ३१ वर्षीय महिलेची डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात गुंतागुंतीची प्रसूती यशस्वीपणे पार पडली. तपासणीत प्लॅसेंटा गर्भाशयाच्या पडद्यातून खोलवर वाढून मूत्राशयापर्यंत पोहोचल्याचे आढळले होते. या स्थितीत प्रसूतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्रावाचा धोका असल्याने डॉक्टरांनी आधीच शस्त्रक्रियेचे नियोजन केले. महिलेने ३.३ किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला असून, बाळाला पुढील उपचारांसाठी नवजात बालक कक्षात दाखल करण्यात आले.
ममता जाधव यांची यापूर्वी सिझेरियन प्रसूती झाली होती. ३०व्या आठवड्यातील एमआरआयमध्ये प्लॅसेंटा गर्भाशयाच्या पडद्यातून पुढे वाढून मूत्राशयापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले. ३१व्या आठवड्यात रक्तस्राव झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्लॅसेंटा पेक्रेटा ही गंभीर स्थिती असल्याने शस्त्रक्रियेपूर्वी रक्तसाठा, भूल, अतिदक्षता विभाग आणि आवश्यक तज्ज्ञांची टीम सज्ज ठेवण्यात आली.
स्त्रीरोगतज्ज्ञ, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट, मूत्रविकार तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि इतर वैद्यकीय पथकाच्या समन्वयातून ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया पार पडली. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. सुशील पाटील यांनी रक्तप्रवाह नियंत्रित करण्यासाठी बलून कॅथेटरची प्रक्रिया केली, तर मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. विवेक जाधव यांनी मूत्राशयाशी संबंधित उपचार केले. पूर्वनियोजन आणि तज्ज्ञांच्या समन्वयामुळे आईची प्रसूती सुरक्षितपणे पार पडली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
Designed by Web Creations 2022. All rights reserved.